न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड शहराचे दोन भाग करून घरोघरचा कचरा जमा करून तो मोशी कचरा डेपोत वाहून नेण्याच्या वादग्रस्त कामास अखेर आज सोमवारी (दि. १) रोजी सुरुवात केली जाणार आहे. हे काम तब्बल ८ वर्षे ए.जी. इन्व्हायरो इन्फ्राप्रोजेक्टस व बीव्हीजी इंडिया या दोन कंपन्या करणार आहेत. त्यासाठीची सर्व वाहने ठेकेदार कंपनीच्या मालकीची आहेत.
दापोडी ते निगडी जुन्या महामार्गानुसार दक्षिण व उत्तर असे दोन भाग करून हे काम होणार आहे. न्यायालयाच्या आदेशावरून हे काम सुरू करण्यास
स्थायी समितीपाठापाठ पालिका प्रशासनाने फेब्रुवारीच्या अखेरिस मंजूरी दिली. हे काम बीव्हीजीने १ एप्रिलपासून सुरू केले. मात्र, कंत्राटी कामगार घेण्यावरून आणि स्वत:च्या वाहनांऐवजी पालिकेची वाहने वापरल्याने हे काम दुस-या दिवशीच थांबविण्यात आले. त्यानंतर हे काम १ जूनपासून सुरू करण्याचे घोषित झाले. मात्र, वाहनांचे आरटीओमध्ये पासिंगला विलंब होत असल्याने १ जुलैपासून काम सुरू करण्याचा निर्णय स्थायी समिती अध्यक्ष विलास मगिरी यांनी ठेकेदारांचे प्रतिनिधी अधिका-यांच्या बैठकीत जाहीर केला होता.
घरा-घरातून ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करून तो त्या प्रकारचे वेगवेगळे कप्पे असलेल्या घंटागाडीतून वाहून नेला जाणार आहे. सर्व कचरा वाहून नेण्याच्या वेळेचा फलक प्रत्येक वस्तीमध्ये लावला जाणार आहे. तेथून कचरा मोशी कचरा डेपोत नेऊन टाकला जाणार आहे. अरुंद अंतर्गत रस्ते असलेल्या भागात घंटागाडीएवजी ढकलगाड़ी वापरली जाणार आहे. या कामासाठी सर्व वाहने ठेकेदारांच्या मालकीची असणार आहेत. या वाहनांवर देखरेख ठेण्यासाठी पालिकेची ट्रैकिंग यंत्रणा असणार आहे.


















