न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मारक पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील मोरवाडी चौकाजवळील गरवारे कंपनीच्या आवारात होणार आहे. ही जागा पालिकेस आयटूआर अंतर्गत प्राप्त झाली आहे.
शहरातील विविध भागांत महापुरुषांचे पुतळे आणि स्मारके उभारण्याचे काम आतापर्यंत महापालिकेने केले आहे. काही स्मारके उद्यानात विकसित केली आहेत. या स्मारकांमुळे शहरात पर्यटन वाढीस चालना मिळत आहे. त्याच हेतूने पालिकेने शहरात महात्मा गांधींचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरात प्रथमच खासगी संस्थेच्या सहकार्याने हे स्मारक उभे करण्यात येणार आहे. आदित्य बिर्ला ग्रुपने त्यासाठी पालिकेकडे जागेची मागणी केली होती. त्यानुसार पालिका मोरवाडी चौकाजवळील गरवारे कंपनीची नाल्याच्या बाजूची २ एकर जागा उपलब्ध करून देणार आहे. त्यास स्थायी समितीने १९ जूनला मंजुरी दिली आहे. ठराव झाल्यानंतर फाउंडेशनसोबत चर्चा करून संपूर्ण आराखडा निश्चित केला जाईल. त्यास सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन कामाची सुरुवात होईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.


















