न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विभागातील शाळांचा गेल्या पाच वर्षातील निच्चांकी निकाल लागला आहे. या वर्षी शहरातील दहा शाळांचा निकाल ६० टक्क्यांहून कमी लागला आहे. त्या शाळांच्या मुख्याध्यापकांना माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पराग मुंढे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.
यंदा दहावीतील परीक्षेत महापालिकेच्या माध्यमिक विभागाच्या अठरा शाळांपैकी एकाही शाळेचा निकाल १०० टक्के लागला नाही. या वर्षी अठरा माध्यमिक विद्यालयांचा दहावीचा निकाल ६१.९२ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २३ टक्क्यांनी घसरण झाली आहे. यंदाचा निकाल गेल्या पाच वर्षातील सर्वात निचांकी असल्याने पुन्हा एकदा महापालिका शाळांमधील शैक्षणिक दर्जाबद्दल पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दहावीच्या परिक्षेसाठी माध्यमिक विद्यालयाच्या शाळांमधील दोन हजार २१२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी, एक हजार ४६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
निकालाची घसरण झाल्याने माध्यमिक विभागातील शाळा व मुख्याध्यापकाच्या गुणवत्तेबाबत विविध स्तरातून टीका झाली होती. याबाबत, माध्यमिक विभागाने मुख्याध्यापकांची बैठक घेऊन निकालाबाबत चर्चा केली. त्यानुसार, पुढील काळात शिक्षक व मुख्याध्यापकांनी गुणवत्ता सुधारण्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करावे, या विषयी त्यांना सुचना करण्यात आल्या. दहावीचा निकाल उंचावण्यासाठी शिक्षकांनी वैयक्तिक लक्ष देवून विध्यार्थ्यांकडून तयारी करून घ्यावयास सांगितले. पुढील वर्षी निकाल ढासळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा मुंढे यांनी दिला आहे.
या विद्यालयांना पाठविल्या नोटिसा
नेहरूनगर माध्यमिक विद्यालय, काळभोरनगर माध्यमिक विद्यालय, फुगेवाडी माध्यमिक विद्यालय, संत तुकाराम नगर माध्यमिक विद्यालय, श्रमिक नगर-निगडी माध्यमिक विद्यालय, लांडेवाडी माध्यमिक विद्यालय, रुपीनगर माध्यमिक विद्यालय, खराळवाडी माध्यमिक विद्यालय, वाकड माध्यमिक विद्यालय, पिंपरी नगर माध्यमिक विद्यालय.


















