न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जुलै २०१९) :- पुणे मनपाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या पुढाकाराने पुणे महापालिकेने ज्या पद्धतीने पुणे शहरातील माँल्स व थिएटर्समध्ये पार्किंग शुल्क मुक्त केले, त्याचधर्तीवर पिंपरी चिंचवड शहरातील मॉल्स व थिएटर्समध्येही पार्किंग शुल्क मुक्त करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन गोडांबे यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात मॉल्स व थिएटर येथे पार्किंग शूल्काच्या नावाखाली ग्राहकांची लूटमार सुरूच आहे. स्वतःचे पैसे खर्च करून माँल्स व थिएटरमध्ये जाणारे नागरिक तेथील खरेदीमुळे त्यांचा फायदा करून देत असतातच तरी, पुन्हा पार्किंगसाठी वेगळे पैसे देणे म्हणजे खंडणी वसुलीच आहे.
याचा सारासार विचार करून, आयुक्तांनी पुण्यासारखीच भूमिका येथेही घ्यावी. पिंपरी चिंचवड शहरातील मॉल्स व थिएटरमध्येही पार्किंग शुल्क मुक्त करावे. त्यासाठी आदेश काढून तातडीने सर्व मॉल्स व थिएटर मालकांना नोटीसा पाठवाव्यात व जे ऐकणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व ही दिवसाढवळ्या होणारी लूट थांबवावी, असे गोडांबे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


















