न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी :- भोसरीतील गवळीनगर प्रभाग क्रमांक ५ येथे नगरसेविका अनुराधा गोफणे यांच्या माध्यमातून प्रभागातील महिलांना मोफत कापडी पिशवी तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी गोफणे म्हणाल्या कि, राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली असून, प्लास्टिक पिशवी आढळल्यास महापालिका दंड आकारते. प्लास्टिक हे विघटनशील पदार्थ नसून त्याची पर्यावरणाद्वारे विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. पर्यायाने नैसर्गिक चक्र बिघडवून दुष्काळासारखे प्रश्न मानवजातीपुढे निर्माण होत आहेत.
यावेळी प्रभागातील ४० ते ५० महिलांना कापडी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. आठदिवसीय प्रशिक्षण शिबिरामध्ये विविधरंगी कापडी पर्स तसेच इतर घरगुती वापराच्या कापडी पिशव्या, कॅरीबॅग व एकूण २० प्रकार महिलांना शिकवण्यात आले.
या माध्यमातून आर्थिक बाबतीत स्वावलंबी होऊन स्वतःचा चरितार्थ चालवणे महिलांना सोपे होईल, तसेच या माध्यमातून प्लास्टिक विरोधी लाट निर्माण होऊन प्लास्टिक हद्दपार होण्यास मदत होईल असे सामाजिक कार्यकर्ते देविदास गोफणे म्हणाले.
याप्रसंगी नगरसेविका अनुराधा गोफणे, देविदास गोफणे व प्रभागातील प्रशिक्षणार्थी महिला व आदी उपस्थित होते.











