न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींच्या वाहनांवरील ‘लोगोचा’ दुरुपयोग वाढला आहे. अनेक स्वयंघोषित तोतया आमदारांच्या वाहनांवर या लोगोचा वापर होताना दिसत असून त्यामुळे नागरिकांना खऱ्या आमदारांचे वाहन कोणते? असा प्रश्न पडला असल्याचे दिसून येते.
त्यातली त्यात भोसरी विधानसभा मतदारसंघात या स्वयंघोषित तोतया आमदारांच्या वाहनांवर या लोगोचा सर्वाधिक वापर होताना दिसत येत असून या बनावट तोतया आमदारांची वाहने पालिकेपर्यंत पोहचल्याने तसेच ते भारतीय राजमुद्रेचा गैरवापर करीत असल्याने या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याकडे केली आहे.
”विधानसभा सदस्य” असे स्टीकर आपल्या मोटारीवर लावणारे हे तोतये आमदार हे खऱ्या आमदारांचे कार्यकर्ते आहेत, असा दाट संशय राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी व्यक्त केला आहे. आपल्या प्रभागात (चिखली) तसेच मोशी, भोसरी येथे या बोगस आमदारांचा वावर आहे, असेही ते म्हणाले.
निवडून आलेल्या आमदारांसाठी विधानसभा सदस्य असा मजकूर असलेले स्टीकर शासनाने दिले आहेत. विधानसभा वा मंत्रालयात सुलभ प्रवेश मिळणे हा उद्देश त्यामागे आहे. मात्र, काही आमदारांकडून हे स्टिकर्स आपल्या कार्यकर्त्यांना दिले गेले आहेत, असा संशय आहे. त्यातूनच शिरूर (जि.पुणे) पोलिस ठाण्याने अशा स्टीकरचा बेकायदा वापर केल्याबद्दल एका तोतया आमदाराविरुद्ध गुन्हाही दाखल केलेला आहे.
त्यानंतरही त्यांचा सुळसुळाट सुरूच आहे. टोलमध्ये सवलत आणि व्हीआयपी सवलत मिळावी या उद्देशातून काही आमदारांच्या कार्यकर्त्यांनीच आमदारांसाठी असलेले हे स्टीकर आपल्या मोटारीवर लावले आहेत. त्यामुळे शहरात तीन आमदार असताना प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी अधिक वाहनांवर आमदार असल्याचे स्टिकर्स लागलेले दिसत आहेत.











