न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जुलै २०१९) :- मागील अनेक वर्षांपासून कुदळवाडीत सार्वजनिक स्वच्छतागृहाची मागणी होत होती. या परिसरात येणाऱ्या नागरिकांना अन्य पर्याय नसल्याने रस्त्याच्या कडेला एखादा आडोसा पकडून नैसर्गिक विधी आटोपावे लागत असे. कुदळवाडीतील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याबाबत स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत स्थापत्य विभागास निवेदन दिले होते.
महापालिकेच्या स्थापत्य विभागास संपर्क करून, स्वच्छतागृह बांधण्याची मागणी केली होती. अधिकाऱ्यांना याबाबत जागाही दाखवण्यात आली होती. परंतु, महापालिकेकडून स्वच्छतागृह उभारणीबाबत अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांना याबाबत लक्ष पुरविण्याची मागणी केली. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतागृह उभारणीबाबत पाठपुरावा सुरु होता.
अखेर आमदार महेश लांडगे याच्या सहकार्याने आज मंगळवार (दि. २ जुलै) रोजी कुदळवाडीतील यादवनगर परिसरात पिं. चिं. मनपा स्थानिक विकास निधी मार्फत स्वच्छतागृह बांधण्यात आले. या कामासाठी स्थापत्य विभागाचे अधिकारी सवणे, वाघमारे, कोबल यांचे सहकार्य लाभले. स्वच्छतागृहाची मागणी मार्गी लागल्यामुळे कुदळवाडी परिसरातील ग्रामस्थांनी आ. महेश लांडगे व स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.











