न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जुलै २०१९) :- दुचाकीवर आलेल्या मद्यधुंद टवाळखोरांनी पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करीत परिसरात दहशत पसरवली. यामध्ये आठ वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी (दि. २) रोजी पहाटेच्या सुमारास सांगवीतील साई चौक परिसरात घडली. या प्रकरणी हेमंत काळूराम रासकर (३१, रा. विठ्ठलवाडी, देहरोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दोघांचा शोध सुरू आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी रासकर हे मंगळवारी साई चौक येथील मल्हार मिरॅकल गार्डन समोर त्यांची मोटार पार्क करून झोपले होते. दरम्यान, तिघेजण मद्यधुंद अवस्थेत त्या ठिकणी आले. त्यांनी आरडा ओरडा तसेच मोटारीवर दगडफेक करीत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे रासकर घाबरल्याने त्यांनी आरोपींना प्रतिकार केला नाही. रासकर यांच्या मोटारीवर दगडफेक केल्यानंतर आरोपींनी परिसरात पार्क केलेल्या तीन टेम्पो आणि पाच कारची तोडफोड केली. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या घटनेची पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी गंभीर दखल घेतली. काही तासांच्या आत आरोपी अटक झाले पाहिजेत, असा आदेश दिल्याने सांगवी पोलिसांनी आरोपीच्या शोधात परिसर पिंजून काढला. हद्दीतील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यावरून सायंकाळी एकाला ताब्यात घेतले तर, इतर दोघांचीही ओळख पटली असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक गणेश खारगे करीत आहेत.















