न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जुलै २०१९) :- देहूरोड, चाकण तळेगाव दाभाडे आणि हिंजवडी पोलीस ठाण्यांची हद्द विभाजित करून रावेत, शिरगाव, म्हाळुंगे आणि बावधन या नवीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव महासंचालक कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. मंगळवारी (दि. २) रोजी रावेत, शिरगाव आणि म्हाळुंगे (चाकण) या प्रस्तावित पोलिस ठाण्यांचे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, नम्रता पाटील, सहायक आयुक्त श्रीकांत मोहिते, पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, ज्ञानेश्वर साबळे, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, नगरसेविका संगीता भोंडवे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आयुक्त पज्ञनाभन म्हणाले की, नागरिकांना वेळेत मदत मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी पोलिस ठाणे स्तरावर संकल्पना सुरु करण्यात आली. यामध्ये नागरिकांना सात ते पंधरा मिनिटांमध्ये मदत मिळावी, अशी अपेक्षा आहे. रावेत, चाकण-शिरगाव आणि बावधन परिसरातील नागरिकांना तक्रार देण्यासाठी लांबचा पल्ला पार करावा लागत असल्याने या परिसरात स्वतंत्र पोलिस ठाणे उभारण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. महासंचालक कार्यालयाकडून मान्यता मिळाल्यानंतर या पोलिस ठाण्याचा कारभार सूरू होणार आहे.











