न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जुलै २०१९) :- अवैध पिस्तूल बाळगणाऱ्यास पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी सोमवारी (दि. १) रोजी स्पाईन चौक, मोशी येथे ही कारवाई केली. किशोर बबन ढोरे (३५ , रा. भगतवस्ती, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
परिमंडळ एकच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी विजय दौंडकर आणि मयूर दळवी यांना मोशी येथील स्पाईन चौकात एकजण कंबरेला पिस्तूल लावून थांबल्याची खबर मिळाली. त्यानुसार त्यांनी परिसरात सापळा रचून ढोरेला ताब्यात घेतले.
पोलिसांनी ढोरेची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आणि तीन काडतुसे मिळून आली. त्याच्यावर भारतीय हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.











