न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील एकूण १ लाख ९७ हजार ७४२ मिळकतधारकांनी ३० जूनअखेर एकूण २२८ कोटी २३ लाख रुपयांचा मिळकतकर जमा केला आहे. नागरिकांनी लवकरात लवकर कराची रक्कम भरून व्याज व दंड टाळावा, असे आवाहन सहायक आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.
शहरातील एकूण १ लाख ८ हजार २२ जणांनी ऑनलाईन सुविधेचा वापर करून तब्बल १२६ कोटी ८५ लाख रुपयांचा कर भरला आहे. उर्वरित ८९ हजार ७२० मिळकतधारकांनी रोख, धनादेश व डीडीद्वारे १०१ कोटी ३८ लाख रुपयांचा भरणा केला आहे. एकूण ८ हजार ११६ महिला मिळकतधारकांनी ६ कोटी ५९ लाख, ५८० दिव्यांग मिळकतधारकांनी ४० लाख दोन हजार २६९, निवृत्त सैनिकांनी १ कोटी ७३ लाख, १२ शौर्यपदक सैनिकांनी ३० हजार रुपयांचा मिळकतकर भरणा केला आहे.
गेल्या वर्षी ३० जूनअखेरपर्यंत एकूण १ लाख ७२ हजार ७२६ जणांनी एकूण १८५ कोटी ६० लाख रुपयांचा भरणा केला होता. यंदा त्यात ३७ कोटी ६३ लाखांनी वाढ झाली आहे. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात ५८२ कोटींचे वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी ३० सप्टेंबरपूर्वी थकबाकीसह मिळकतकर भरून दरमहा २ टक्के आणि शासन कर वार्षिक १० टक्के व्याजाचा दंड टाळावा. मिळकतकर ऑनलाईन माध्यमातून भरून २ टक्के सामान्यकरात सवलत मिळवा, असे आवाहन चितळे यांनी केले आहे.















