- प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांचा मागील अनुभव वेगळाच
- भालकर शहरातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामावर वचक निर्माण करू शकतात
- नगरसेवक शीतल शिंदे यांची मागणी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जुलै २०१९) :- महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासन आदेश क्रमांक पीओजी १२१७ / प्र. क. १६६ / सेवा दिनांक ८ जून २०१९ अन्वये श्री. अ. मा. भालकर कार्यकारी अभियंता (स्थापत्य) यांची या पदावरुन अधीक्षक अभियंता (स्थापत्य) या पदावर पदोन्नती देऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी यांच्या आस्थापनेवरील अधीक्षक अभियंता (स्थापत्य) या रिक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आलेली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी भालकर यांच्याकडे अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण या खात्याचा पदभार द्यावा, अशी मागणी नगरसेवक शितल उर्फ विजय गोरख शिंदे यांनी महापालिका आयुक्त व सहायक आयुक्त (प्रशासन) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाकडुन प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी श्री. भालकर यांना शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण या खात्याचा पदभार देण्यात यावा. तसेच, आताचे शहर अभियंता राजन पाटील यांच्याकडे आहे, त्या विभागाचा कार्यभार चालु ठेवावा. आजपर्यंत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांचा अनुभव लक्षात घेता भालकर हे शहरातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामावर वचक निर्माण करतील, असे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे.











