न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जुलै २०१९) :- अल्पवयीन मुलीचे वय पूर्ण नसताना देखील आरोपींनी तिच्या आई-वडिलांवर दबाव आणून तिचा २४ वर्षीय आरोपी पतीसोबत विवाह लावून दिला. तिच्या इच्छेविरोधात पतीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. शरीरसंबंध ठेवल्याने पीडित मुलगी गर्भवती झाली. त्यानंतर आरोपींनी ‘आम्हाला हे मूल नको’ म्हणून पीडित मुलीच्या पोटात लाथाबुक्क्यांनी मारले. यामुळे मुलीच्या पोटातील गर्भ मृत झाला.
त्यानंतर आरोपींनी मुलीला नांदवण्यासाठी मुलीच्या माहेरच्या लोकांकडे २५ लाख रुपयांची मागणी केली. हा प्रकार एप्रिल २०१८ ते मे १९ या कालावधीत जाधववस्ती येथे घडला. यानंतर १७ वर्षीय पीडित मुलीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी चिखली पोलिसांनी पीडित मुलीच्या पती आणि सासूला अटक केली आहे.















