न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जुलै २०१९) :- भोसरी एमआयडीसी परिसरात पहिल्याच पावसात सर्व रस्त्यांची दुरावस्था झाली. अनेक कंपन्यांमध्ये पाणी शिरल्याने उद्योजकांचे व परिसरातील नागरिकांचे अतोनात हाल झाले. याबाबत स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी प्रसिद्धीस पत्र दिले आहे.
या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, भोसरी एमआयडीसी परिसरात पेंट मेडिकल प्लेटिंग, रबर केमिकल इंडस्ट्रीज आणि जागोजागी अनधिकृत खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. त्याचे सांडपाणी, कचरा, हा पावसाच्या पाण्यात जमा होत आहे. या पावसाच्या पाण्यात बऱ्याच भागात केमिकल मिश्रित पाणी रस्त्यावर आल्याने अनेक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. हे पाणी रस्त्यावरील नागरिकांच्या अंगावर उडाल्याने नागरिकांना अलर्जीचा त्रास होऊ लागला आहे. महापालिकेनेही या औद्योगिक परिसरात गेल्या ४० वर्षात ड्रेनेजची कुठलीही सुविधा केलेली नाही. महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात त्याला अजिबात स्थान नाही. रासायन मिश्रित पाणी रस्त्यावर सोडले जाते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना किडनी, दमा, सर्दी, खोकला व अनेक प्रकारचे आजार उद्भवत आहेत.
या परिसरामध्ये चार ते पाच हजार इंडस्ट्रीज आहेत. त्यापैकी कमीत कमी एक हजार इंडस्ट्रीजमध्ये केमिकलच्या संबंधित कामे होतात. परंतु, मल-मूत्र विसर्जन यापासून ते केमिकल ते सांडपाण्यापर्यंत कुठलीही प्रक्रिया औद्योगिक परिसरात नाही. सदर पाणी सर्व रस्त्यावर सोडले जाते. त्यामध्ये ऍसिडसारखे अनेक विषारी घटक असतात. महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. सदर केमिकलयुक्त पाण्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावायची. याचं ट्रेनिंगसुद्धा उद्योजकांना दिले जात नाही. त्यावर महानगरपालिका प्रशासन ढिम्म आहे. दरवर्षी जिकडे पाहावे तिकडे रस्त्यावर केमिकल मिश्रित पाणी पोहचत आहे. त्यामुळे परिसरातील जनावरे, लहान मुले व इतरांना त्याचा खूप त्रास होतो.
याबाबत लवकरच प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना संघटनेतर्फे निवेदन देण्यात येणार आहे व त्यांना रसायनयुक्त अशा सर्व कंपन्यांना प्रदूषण महामंडळाने ट्रेनिंग द्यावे, त्यावर उपाययोजना सुचवण्याची मागणी करण्यात येणार आहे. राज्य सरकारने पुढील तीन वर्षात होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याबाबतचे धोरण लागू केले आहे. या धोरणाची महानगरपालिकेने अंमलबजावणी केल्यास मोठ्या प्रमाणावर या पाण्याचा प्रश्न सुटेल. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील उद्योगांना त्यांच्या परिक्षेत्रातील प्रक्रियायुक्त सांडपाणी प्राधान्याने वापरणे बंधनकारक केले आहे. सांडपाणी वाहिन्यांची यंत्रणा प्रक्रिया केंद्रापर्यंत करावी व प्रक्रियायुक्त पाण्याचा पुनर्वापर करण्याचे बंधन उद्योगांना घातल्यास निश्चितच पर्यावरणाचा व आरोग्याचा प्रश्न सुटेल,.असे अभय भोर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


















