न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जुलै २०१९) :- राष्ट्रवादीचे दत्ता साने यांनी शेवटी पक्ष नेतृत्वाचा आदर करीत, पिंपरी चिंचवड महापालिका विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा आज मंगळवार (दि. ९) रोजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे सुपूर्द केला.
राष्ट्रवादीच्या धोरणानुसार सर्वांना एक-एक वर्ष या पदावर संधी देण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतलेला आहे. यानुसार साने यांच्या पदाचा १ वर्षाचा कार्यकाळ संपल्याने त्यांना अजित पवार यांनी राजीनामा देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. दत्ता साने यांनी आपल्या कार्यकाळात सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडले. अनेक विषयांना त्यांनी प्रत्यक्ष हात घालत सत्ताधारी पक्षाचा पारदर्शकतेचा बुरखा फाडला. त्यांच्या कार्यकाळात कचरा निविदा, संतपीठ व आदी विषयांबाबत सत्ताधारी पक्षाला यु-टर्न घ्यावा लागला.
साने यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असला तरी, महापौर विदेश दौऱ्यावर असल्याकारणाने त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. महापौर दौऱ्यानंतर आल्यानंतरच त्यांच्या राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. साने यांचा विरोधीपक्षनेते पदाचा झंझावात पाहता अद्यापही राष्ट्रवादी त्यांना पुन्हा विरोधीपक्षनेते पदी काम करण्याची संधी देऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.











