न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जुलै २०१९) :- प्राधिकरण येथील हेडगेवार भवनच्या शेजारील मोकळ्या भूखंडाचा चक्क महापालिकेकडूनच अनधिकृतरित्या वापर होत होता. २०१३ सालापासून या परिसरातील नागरिक या जागेच्या अनधिकृत वापराविरोधात लढा देत होते. या जागेवर कच-याच्या गाड्या, शौचालयाच्या फिरत्या गाड्यांचे पार्किग मोठ्या प्रमाणात केले जात आहे. या गाड्या स्वच्छ धुतल्या न गेल्यामुळे परिसरात नागरिकांना दुर्गंधी पसरत आहे. पावसाळ्यात हा प्रश्न आणखीनच बिकट होतो. त्याचबरोबर या मोकळ्या जागेवर लोखंड, भंगार, टायर अशा वस्तूंचा साठा ठेवण्यात आला आहे. या वस्तूंमध्ये पाणी साचून मलेरिया, डेंग्यू यांसारख्या भयंकर आजारांचा नागरिकांना सामना करावा लागतो आहे.
या परिसराची तत्कालीन आयुक्त आशिष शर्मा ते सध्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यापर्यंत सर्वच आयुक्तांनी जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. मात्र, आजतागायत यावर कोणतीच ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. या परिसरातील अस्वच्छता व त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी नुकतीच या परिसराची पाहणी केली.
यावेळी डॉ. रमेश बन्सल, राकेश सिंघानीया, विनोद बन्सल, सुशील सहानी, चंद्रकांत कोठारी, सुनील मडकीकर, रमेश सरदेसाई, पुरुषोत्तम चुघ, सूर्यकांत मुथीयान, प्रकाश महाजन, मोहिंद्रा, रानु सिंघानीया, भूषण सहानी, देबनशू चौधरी असे जवळजवळ ५० सदस्य त्यावेळी उपस्थित होते. या रहिवाशांनी गोरखे यांना २०१३ सालापासूनची सबांधित पत्रव्यवहाराची फाईल दाखवण्यात आली. गोरखे यांनीही कचरा गाड्या, मोबाईल टॉयलेट, कॉम्पॅक्टर, खराब झालेले टायर, भंगार गाड्या, वायर्समुळे आजूबाजूच्या रहिवाश्यांना होत असलेला त्रास नीट समजावून घेतला.
सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने त्यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे त्यावेळी सांगितले. आयुक्तांकडूनही हा प्रश्न मार्गी न लागल्यास शेवटी मुख्यमंत्री दरबारी हा प्रश्न उपस्थित करू, असेही आश्वासन त्यावेळी गोरखेंनी उपस्थितांना दिले होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून याबाबत त्यांना लक्ष पुरविण्याची मागणी केली. या मागणीची सकारात्मक दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असल्याचे समजते.
स्वतः मुख्यमंत्र्यांनी ह्या कामात लक्ष घालायचे ठरविल्यामुळे लवकरच येथील समस्या मार्गी लागणार आहे. अमित गोरखे यांनी आमच्यासाठी जे काम करून दाखवले आहे, ते खरोखर वाखाण्याजोगे आहे. गेली सहा वर्षे आम्ही नागरिक ह्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे लढा देत आहोत, पण यश काही मिळत नव्हते, अमित गोरखे यांनी याबाबत सकारात्मक पाऊल उचलल्यामुळे हा प्रश्न तडीस लागणार, असे मत येथील रहिवाशी सहानी यांनी यावेळी व्यक्त केले.















