न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये कधी नव्हे तो, कचऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील अनेक महिन्यांपासून शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी कचरा साचलेला दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्ते तसेच नगरसेवकांनी स्वतः वारंवार मागणी करूनही कचरा प्रश्न मार्गी लावण्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला अपयश आले आहे. याबाबत अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी तातडीने मार्ग काढा, अन्यथा आयुक्त बंगल्यावरच डस्टबिन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
काही लोकप्रतिनिधींनी तर थेट आरोप केला आहे की, टक्केवारीच्या कारणावरून कचरा निविदा प्रक्रिया लांबवली गेली. आज शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी, मनसे ,शिवसेना, सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनीसुद्धा कचरा फेकून आंदोलन केले. त्यामुळे कचरा प्रश्न योग्य उपाययोजना करून मार्गी लावणे विरोधी पक्षातील व सत्तधारी नगरसेवकांचे सुद्धा हातात नाही तर मग नेमक्या कुणाच्या हातात आहे? असा प्रश्न पडतो.
१ जुलैपासून आरोग्य विभागाने कचरा संकलन व वाहनाचे काम बीव्हीजी इंडिया व ए.जी इन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंपन्यांना दिले आहे. त्यापोटी त्यांना लाखो रुपये देण्यात येणार आहेत. परंतु आठवडा उलटून गेला तरी या दोन्ही कंपन्यांना शहरातील कचरा समस्या मार्गी लावता आली नाही. काहीही असले तरी पिंपरी चिंचवड शहरचे आरोग्यप्रमुख व आयुक्त श्रावण हर्डीकर हेच या समस्येला जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी येत्या शनिवार दि.१३/०७/२०१९ पर्यंत या प्रश्नी तातडीने तोडगा काढावा. अन्यथा अपना वतन संघटनेच्या वतीने रविवार दि. १४/०७/२०१९ रोजी सकाळी १० वाजता पालिका आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्या बंगल्यावर डस्टबिन आंदोलन करण्यात येईल. यासाठी सर्व नागरिक व मनसे, राष्ट्रवादी, भाजपचे कार्यकर्तेसुद्धा आपापल्या घरातील कचरा डस्टबिन मध्ये भरून मोरवाडी येथील आयुक्तांच्या बंगल्यासमोर ठीक १० वाजता हजर राहणार आहेत, असे या पत्रकात म्हटले आहे.















