न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०१९) :- पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात संगीत कारंजे बसविण्याचा ४ कोटी १४ लाखाचा विषय मंजूरीत झालेल्या गैरव्यवहाराची उच्चस्तरिय चौकशी करुन दोषींवर योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात संगीत कारंजे बसविण्यात येणार आहेत. तसेच विद्युतविषयक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. निविदा दर ४ कोटी १४ लाख ९९ हजार रूपये अपेक्षित धरण्यात आला. त्यानुसार, एस. टी. इलेक्ट्रीकल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एम. बी. इलेक्ट्रीकल्स या दोनच ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्ये एस. टी. इलेक्ट्रीकल्स यांनी निविदा दरापेक्षा ३.०१ टक्के कमी तर, एम. बी. इलेक्ट्रीकल्स यांनी ५ टक्के कमी दर सादर केला. नियमानुसार, कमीत कमी तीन ठेकेदारांनी निविदा सादर करणे बंधनकारक आहे. दोनच ठेकेदारांनी निविदा सादर केल्याने निकोप स्पर्धेसाठी महापालिकेने फेरनिविदा मागविणे आवश्यक होते.
उद्यानात संगीत कारंजे बसविण्यासाठी निविदा प्रक्रीयेत दोनच ठेकेदारांनी निविदा सादर केल्या होत्या. असे असताना फेरनिविदा मागविण्याची तसदी न घेता चार कोटीचे काम दोन ठेकेदारांपैकी लघुत्तम दर एस. टी. इलेक्ट्रीकल्स या ठेकेदाराचा ४ कोटी २ लाख ५० हजार रूपये हा दर लघुत्तम असल्याने मा.स्थायी समिती व सर्व पक्षीय सदस्यांनी नुकतीच मान्यता दिली.
मा. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २६ जून रोजी ही निविदा स्विकारण्यास मान्यता दिली होती. यामध्ये सत्ताधारी, सर्व पक्षीय विरोधक व प्रशासन यांच्यात स्थायी समिती अंडरस्टँडींग होऊन गैरव्यवहार झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात संगीत कारंजे बसविण्याचा ४ कोटी १४ लाखाचा विषय मंजूरीत झालेल्या गैरव्यवहाराची उच्चस्तरिय चौकशी करुन दोषींवर योग्य कार्यवाही व्हावी, असे भापकर यांनी या निवेदनात म्हटले आहे.















