न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १९ जुलै २०१९) :- कोथरूडमधील गुजरात कॉलनी, सर्व्हे क्रमांक ८८ येथील एसआरए प्रकल्पात संबंधित बांधकाम व्यावसायिकाने मनमानी करीत या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नागरिकांच्या घरावर बुलडोझर फिरवला आहे, त्यामुळे या रहिवाश्यांना ऐन पावसाळ्यात उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. या बांधकाम व्यावसायिकावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
येथील रहिवासी सर्व कागदोपत्री पुरावा असूनही त्यांना अपात्र ठरवले जात आहे. एसआरए कायद्यातील तरतुदींचे पालन न करता सहा घरे पाडून टाकण्यात आली आहेत. वास्तविक १९८० पासून नागरिक येथे वास्तव्यास आहेत. येथे सुमारे १०० घरे असून, यातील ३० ते ४० टक्के नागरिकांचा एसआरए प्रकल्पाला प्रतिसाद आहे. मात्र, उर्वरित लोकांचा याला विरोध आहे. तरीही प्रशासनाला हाताशी धरून यश बिल्डकॉन या बांधकाम व्यावसायिकाने प्रकल्प मंजूर करून घेतला आहे.
सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जागेवर बांधकाम व्यावसायिक यश बिल्ड कॉन यांनी एसआरए योजना करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये प्रत्येक रहिवाशाला घर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. यासाठी सर्व झोपडपट्टी धारकांकडून त्यांच्याकडील रहिवासी पुरावे मागण्यात आले. मात्र, येथे राहणाऱ्या १०० पैकी फक्त ३० ते ४० रहिवाशांनी या योजनेस तयारी दर्शवली. बाकी रहिवाशांनी या योजनेस विरोध केला होता. सरसकट सर्व रहिवाशांना घरे देणे अपेक्षित असताना आणि रहिवासाचे सर्व पुरावे या रहिवाश्यांकडे असताना ठराविक लोकांनाच या प्रकल्पात घरे मंजूर करण्यात आली. त्यामुळे या योजनेच्या विरोधात या रहिवाशांनी आंदोलन करण्याची तयारी चालवली होती. यामध्ये पुढाकार घेणारे पाच सहा लोक होते, त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता पहाटे लोक झोपेत असतानाच त्यांना घरातून ओढून बाहेर काढून घरे बुलडोझरच्या साहाय्याने जमिनोदोस्त केली. पुराव्यांची तपासणी न करता रहिवाश्यांना अपात्र घोषित केले गेले आहे, असा आरोपही संदीप काटे यांनी केला आहे.
या विरोधात येथील रहिवाशांनी न्यायालयात धाव घेऊन संबंधित बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध दावा दाखल करणार असल्याचा इशाराही काटे यांनी दिला आहे.











