न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०१९) :- महापालिका मुख्यालयातील आयुक्त दालनात पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची आज सहावी बैठक पार पडली. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव व पीसीएससीएलचे अध्यक्ष डॉ. नितीन करिर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, स्मार्ट सिटीचे संचालक महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक प्रमोद कुटे, सचिन चिखले, क्रेंद सरकारच्या प्रतिनिधी ममता बात्रा, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, पीएमपीएमएलच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे, आदी उपस्थित होते.
पिंपळे गुरवमध्ये ‘व्हिलेज प्लाझा’ तर पिंपळेसौदागरमध्ये बहुसुविधा क्रीडा संकूल विकसित करण्यात येणार आहे. ‘व्हिलेज प्लाझा’साठी ४८ कोटी तर क्रीडा संकुलासाठी ३४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. कोकणे चौक येथील नियोजित रिंगरोड अंतर्गत दिल्ली येथील भूमिगत पालिका बाजार व्यापार संकुलाच्या धर्तीवर महापालिका आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापार संकुल उभारणार आहे. त्याचा प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असून निविदा काढण्याची प्रक्रिया लवकरच सुरु केली जाईल’.
‘शहरात ‘ग्रीन बेल्ट’ तयार करण्यात येणार असून त्याचा ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लँडस्केपिंग, टेकड्या एकमेकांना जोडून कनेक्टेड ग्रीन स्ट्रीट करण्यात येणार आहे. शहरातील पवना आणि इंद्रायणी नदीच्या कडेला देखील असा हरित पट्टा करण्यात येणार आहे. तसेच स्मार्ट सिटीतील कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी १७ अभियंत्यांची दोन वर्षांसाठी भरती केली जाणार आहे. भरती करण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आल्याचे, आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.











