न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०१९) :- पिंपरीतील व्यावसायिक हितेश गोवर्धन मूलचंदानी यांचे अपहरण करून, खून केल्याची घटना पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच घडली.
पिंपरी कॅम्पातील सर्व व्यवसायिक बांधवानी नगरसेवक शैलेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवार (दि. २४) रोजी मूक मोर्चा काढून या घटनेचा निषेध नोंदविला. त्यानंतर शगुन चौक या ठिकाणी नगरसेवक शैलेश मोरे यांनी सात्वंन बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस नगरसेवक शैलेश मोरे, शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष युवराज दाखले, पिंपरीतील व्यवसायिक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक शैलेश मोरे म्हणाले की, हितेशचा खून हा प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात रात्री १२ नंतर हाॅटेल व बिअर बार चालू राहतातच कसे? या घटनेमुळे सिंधी बांधव भयभीत झाले आहेत. त्यांनी व्यवसाय करायचा की नाही? शहरात गुन्हेगारीने स्तोम माजविले आहे. वारंवार या घटना घडत आहेत. शहरात पोलीस आयुक्तालय असूनही गुन्हेगारांना मोकळे रान असल्याची स्थिती आहे. त्यामुळे शहरात नागरिक सुरक्षित नसल्याचा संतप्त सवाल नगरसेवक मोरे यांनी यावेळी केला. तसेच आरोपींवर कडक कारवाई करून पून्हा अशी घटना घडू नये, यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पज्ञनाभन यांच्याकडे आरोपींवर कडक शासन करण्याची मागणी केली आहे, असे नगरसेवक मोरे यावेळी सांगितले.
यावेळी सिंधी बांधवानी प्रशासनाच्या विरोधात आपला रोष प्रकट केला. हितेशच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी कडक शासन करून, या परिसरात पून्हा अशी घटना घडू नये यासाठी गुन्हेगारांवर जरब बसविण्याची मागणी केली. हितेशच्या घटनेमुळे आम्ही समाजबांधवांनी व्यवसाय करायचा की नाही, आम्हाला सुरक्षित वातावरण पाहिजे, अशा व्यथा नगरसेवक मोरे यांच्यासमोर मांडल्या. नगरसेवक मोरे यांनीही यापुढे या परिसरात अशी अनुचित घटना घडू नये यासाठी आयुक्त दरबारी पाठपुरावा करून हा परिसर सुरक्षित बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बैठकीत सांगितले. यावेळी युवराज दाखले यांनीही आपले मनोगत ब्य्क्त केले.











