न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०१९) :- हॉटेलसमोर लघुशंका केल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात पिंपरीतील व्यावसायिक हितेश गोवर्धन मूलचंदानी यांचे अपहरण करून, खून केल्याची घटना पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच घडली. या घटनेबाबत शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष युवराज दाखले यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना निवेदन दिले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, पिंंपरी चिंचवड शहरामध्ये गुन्हेगारी वाढणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. यामुळे पिंपरीतील व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी या परिसरात गस्त वाढविणे, व्यापाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी दर महिना बैठक घेणे गरजेचे आहे. तसेच पिंंपरीमधील व्यवसायिक हितेशच्या हत्येतील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कार्यवाही करावी, असे दाखले यांनी या निवेदनात म्हटले आहे.
पिंपरीतील शगुन चौक या ठिकाणी सात्वंन बैठकीत दाखले यांनी व्यापारी बांधवांच्या सदैव सोबत असल्याचे सांगुन धिर व आधार दिला. तसेच भाजप, शिवसेना व शिवशाही व्यापारीसंघ व्यापारी बांधवांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीस नगरसेवक शैलेश मोरे, शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष युवराज दाखले, पिंपरीतील व्यवसायिक उपस्थित होते.











