न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने हे घड्याळाला सोडचिट्ठी देत, धनुष्यबाण हाती घेत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्याला कारणही तसेच आहे. आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दत्ता साने यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देणे यात काही गैर नसले तरी, त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने साने शिवसेनेच्या वाटेवर आहेत की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
दत्ता साने राष्ट्रवादीकडून भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी तीव्र इच्छुक असून, त्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणीही केली आहे. त्यातच त्यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ राष्ट्रवादीला नवसंजीवनी देणारा ठरलेला असतानाही, त्यांना विरोधी पक्षनेतेपदी पुन्हा मुदतवाढ न देता, पक्षाने एकप्रकारे त्यांच्यावर अन्यायच केला आहे. त्यातच त्यांना पक्षाकडून विधानसभेच्या उमेदवारीचे देखील ठोस आश्वासन मिळत नाही. त्यामुळे दत्ता साने यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यास व युतीचा तिढा सुटल्यास व शिवसेना भोसरीत स्वतंत्र लढल्यास शिवसेनेची उमेदवारी दत्ता साने यांना मिळू शकते. याची सर्व राजकीय गणिते आजमावूनच साने शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता आहे.
साने यांनी भोसरीतून विधानसभेस इच्छुक उमेदवार म्हणून पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज सादर केला आहे. राष्ट्रवादीतील विधानसभा इच्छुकांच्या उद्या (रविवारी) पुण्यात मुलाखती होणार आहेत. मुलाखतीला साने गैरहजर राहणार असल्याचेही बोलले जात आहे. साने जर शिवसेनेत गेले तर, मात्र राष्ट्रवादीला भोसरी विधानसभेत तगड्या उमेदवाराची उणीव भासेल. त्यामुळे राष्ट्रवादी साने यांना अडवणार की, जाऊ देणार या प्रश्नाचे उत्तर आगामी काळच ठरवेल.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मी अशा कोणत्याही शुभेच्छा दिलेल्या नाहीत. याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असून, शुभेच्छांचे फोटो कार्यकर्त्यांनीच सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. मी अद्यापही पक्षातच असून, शिवसेनेत जाण्याबाबतचा कोणताच निर्णय अद्यापपर्यंत मी घेतलेला नाही. – दत्ता साने (माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक, राष्ट्रवादी)















