आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचा आंदोलनाचा इशारा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०१९) :- नागरिकांच्या आराेग्याची काळजी घेणाऱ्या रुग्णालयातच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांवर गेल्या अनेक महिन्यापासून दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रुग्णालय रुग्णांच्या आरोग्याशी खेळत आहे. रुग्णालय प्रशासनाने रुग्णांच्या जीवाशी खेळ थांबवावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी दिला आहे.
रामभाऊ जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे रुग्णालय हे खूप जुने आणि नावाजलेले रुग्णालय आहे. इथे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी येतात. हे सुमारे ३५० ते ४०० खाटांचे मोठे रुग्णालय आहे. गरोदर स्त्रिया, सर्दी, ताप, खोकल्याने त्रस्त रुग्ण, लहान मुले, वृद्ध अशा रुग्णांची रुग्णालयात उपचारासाठी गर्दी असते. यामध्ये नवीन रुग्णांची संख्या जास्त असते. असे असताना रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची असुविधा आहे. रुग्णालयाची खूप जुनी पाण्याची टाकी आहे. मात्र, टाकीची स्वच्छता केली जात नाही. वर्षानुवर्षे त्याच टाकीतील पाणी रुग्णांना वापरावे लागत आहे.
रुग्णालयात एका बाजूला पिण्याच्या पाण्याचे जार ठेवलेले असतात. मात्र, या ठिकाणी कोणताही सूचना फलक लावलेला नाही. त्यामुळे या जारमधले पाणी आपल्यासाठी आहे, याची कल्पना रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना नसते. त्यामुळे ते रुग्णालयाच्या जुन्या टाकीतून नळावाटे येणारे दूषित पाणी पितात, जे हातपाय धुण्यासाठी, स्वच्छतागृहासाठी वापरले जाते. एकप्रकारे रुग्णालय प्रशासन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्याशी खेळत आहे. ही बाब रुग्णालय प्रशासनाच्या अनेकदा लक्षात आणून देऊनही रुग्णालय प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यातच साथीचे आजार डोके वर काढत आहेत. अशा परिस्थितीत दूषित पाणी पिल्याने आधीच आजारी असलेले रुग्ण जास्तच आजारी पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालय परिसरात अन्यत्र मात्र चोवीस तास पिण्याचे पाणी उपलब्ध असते. परिसरातील शाळा, दुकाने, घरांना मुबलक पाणी असते. रुग्णालयात मात्र पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याचे जार ठेवलेले आहेत. हे जाणूनबुजून केले जाते की काय, याची शंका येते. दूषित पाण्यामुळे लहान बालकांसह अनेकांना विविध आजारांनी ग्रासले आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखलही घेतली जात नाही.
रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाचीच आहे. असे असताना मागणी करूनही पाण्याच्या टाकीचा मुद्दा गांभीर्याने घेतला जात नाही. रुग्णहित लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने नवीन पाण्याची टाकी बसवावी. स्वच्छ पाणीपुरवठा न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना हे पाणी पिण्यास भेट देत आंदोलनाचा इशारा रामभाऊ जाधव यांनी दिला आहे.















