न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०१९) :- सध्याच्या सायबर युगात मोबाईलच्या वापरामुळे होणारे धोके, इंटरनेटच्या माध्यमातून होणारी फसवणूक अशा अनेक संकटांना आणि समस्यांना आजच्या पिढीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आजच्या कुमार गटातील विद्यार्थ्यांना जागृत करणे ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून मैत्री परिवार संस्था, पुणे शाखा आणि श्री. शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. ३० जुलै, २०१९ रोजी सदर विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये सायबर क्राईमविषयक जागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे शहर सायबर-क्राईम पोलीस उपायुक्त संभाजीराव कदम, विद्यालयाचे संस्थापक-अध्यक्ष आण्णासाहेब जाधव, मैत्री परिवार संस्थेचे राज्याचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे यांच्या शुभहस्ते झाले.
कार्यक्रमप्रसंगी पोलीस उपायुक्त संभाजीराव कदम यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना सायबर क्राईम या विषयावर सखोल आणि बहुमुल्य मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सायबर क्राईमबद्दल जागरूक राहणे अत्यंत आवश्यक असून आपला मोबाईल डाटा कोणालाही सांगू नये, पर्सनल अकाउंटचा OTP, PASSWORD व तत्संबंधी इतर माहिती कोणाशीही शेअर करू नये. अशा साधनांचा आवश्यकतेपुरताच वापर करावा, अशी महत्वपूर्ण माहीती त्यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात अत्यंत साध्या, सोप्या व रंजक भाषाशैलीत विद्यार्थ्यांना सायबर क्राईमबद्दल माहिती सांगितली. पूर्वीच्या काळाच्या तुलनेत आधुनिक सायबरयुगातील पिढीला अशा सायबर क्राईमपासून सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
मैत्री परिवार संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे यांनी विद्यालयातील भौतिक व शैक्षणिक सुविधांचे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरिता आणि प्रगतीकरिता सतत जागरुक असणाऱ्या संस्थापक-अध्यक्ष आण्णासाहेब जाधव यांचे विशेष कौतुक केले. सायबर क्राईमबद्दल घ्यावयाच्या काळजीबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना सतत सतर्क राहण्याचे आव्हान या प्रसंगी केले.
कार्यक्रमप्रसंगी मैत्री परिवार संस्थेचे पुणे जिल्हा-अध्यक्ष अजित शिरोळे, सचिव यशोधन आदमाणे, मैत्री परिवाराचे पालक व उद्योजक बाळासाहेब अरगडे, विद्यालयाचे उपाध्यक्ष जगदिश जाधव, संचालक विजय जाधव, अमित बच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक बाळाराम पाटील, सौ. प्रतिभा देशपांडे, उपमुख्याध्यापक किसन आहिरे, पालक प्रतिनिधी सौ. दुर्गुडेताई हेही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक विद्यालयाचे क्रीडाशिक्षक दत्तात्रय भालेराव यांनी केले, तर शब्बीर मोमीन यांनी उपस्थितांचे आभार मानले.











