सरकारने आमच्या आशांना सुरुंग लावलाय; या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देण्याचा निर्धार आम्ही केलायखजिनदार विजय गुप्ता यांचे सरकारला आव्हान!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ सप्टेंबर २०१९) :- विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वीच राज्यातील रेशन दुकानदारांच्या कमिशनमध्ये किंटलमागे १०० रूपयांची भरघोस वाढ करण्याचे आश्वासन राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी रेशन दुकानदारांना दिले होते. तसा प्रस्तावही त्यांनी राज्य पुरवठा विभागाकडे पाठविला असल्याचे सांगितले होते. त्यामुळे कमिशन वाढीसाठी वर्षभरापासून लढा देणाऱ्या दुकानदारांना दिलासा मिळण्याच्या आशा वाढल्या होत्या. अखेर मात्र, सत्ताधारी युती सरकारने राज्यातील ५१ हजार रेशन दुकानांदारांना दिलेले हे आश्वासन हे गाजरांचा पाऊसच ठरले, असे विधान ऑल इंडिया फेरप्राईज शॉपकिपर्स असोसिएशनचे खजिनदार विजय गुप्ता यांनी केले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीस पत्रक दिले आहे.
या पत्रकात गुप्ता यांनी म्हटले आहे की, राज्यभरातील रेशन दुकानदारांनी कमिशनमध्ये वाढ करावी, स्टेशनरी खर्च, वीज बिल मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी वर्षभरापासून विविध मार्गाने लढा दिला होता. मात्र, सरकार दरबारी त्याची दखल घेतली जात नसल्याने १ सप्टेंबरपासून धान्य उचल व वाटप बंद करण्याचा निर्णय दुकानदारांनी घेतला होता. दुकानदारांच्या बहिष्कारापुढे काहीसे नमते घेत सरकारने कमिशनमध्ये वाढ करण्याचे दुकानदारांना आश्वासन दिले होते. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत किंटलमागील कमिशनमध्ये १५० वरून २५० रूपये करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला होता.
सरकारने गेल्या काही वर्षात स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेत मोठे फेरबदल केले. मात्र, हे फेरबदल करताना आमच्याकडे दुर्लक्ष झाल्याची भावना दुकानदारांमध्ये निर्माण झाली होती. त्यामुळे दुकानदारांनी वेळोवेळी आंदोलनाचे अस्त्र उगारले. दरम्यानच्या काळात सरकारने धान्य कमिशनमध्ये ७० रूपयांवरून दीडशेपर्यंत वाढ केली. मात्र, तरीही खर्च परवडत नसल्याची भावना दुकानदारांमध्ये होती. त्याचीच परिणीती म्हणून दुकानदार पुन्हा कमिशन वाढीसाठी आक्रमक झाले होते. या आंदोलनाच्या पार्शवभूमीवर आचारसंहितेपूर्वीच कमिशनमध्ये वाढ होऊन त्याचा फायदा राज्यभरातील ५१ हजार रेशन दुकानांदारांना मिळवून देणार, असे आश्वासन मंत्री निलंगेकर यांनी रेशन दुकानदारांना दिले होते. मात्र, नेहमीप्रमाणेच सरकारने आमच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. या सरकारने आमचा भ्रमनिरास केला असून, त्याचे परिणाम या विधानसभा निवडणुकीत सरकारला भोगावे लागणार आहेत. राज्यातील ५१ हजार रेशन दुकानधारकांच्या आशांना सरकारने सुरुंग लावला आहे. राज्यातील दुकानधारकांना गाजरांचे आश्वासन दाखवणाऱ्या या सरकारला या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देण्याचा निर्धार आमच्या रेशन दुकानधारकांनी केला आहे. त्याची परिणीती युती सरकारच्या पराभवात होईल, असा इशारा या पत्रकाद्वारे गुप्ता यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.















