न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ ऑक्टोबर २०१९) :- पुणे जिल्हा निवडणूक कार्यालय, २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ व यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार (दि. ९) रोजी सकाळी १०:३० वाजता संस्थेच्या चिंचवड येथील कॅम्पसमध्ये ‘मतदार जनजागृती अभियानाचे’ आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात स्वीप (सिस्टेमॅटिक व्होटर एज्युकेशन अँड इलेक्ट्रोल पार्टीसिपेशन प्रोग्राम) अंतर्गत मतदाराचे हक्क, कर्तव्य व जाणीव जागृतीचे कार्य या मतदार जनजागृती अभियानाद्वारे होणार आहे.
या कार्यक्रमात सर्वजण मतदानाचा हक्क बजावण्याबद्दल सामुहिक शपथ घेतील, तसेच २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक अधिकारी मनिषा कुंभार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त तथा स्वीपचे नोडल अधिकारी अण्णा बोदडे, स्वीप उपक्रमाचे नोडल अधिकारी अजय पवार, यशवंत मानखेडकर, आशाराणी पाटील यांच्यासह निवडणूक विभागाचे अधिकारी उपस्थितांना निवडणूक प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहेत. या कार्यक्रमात ‘यशस्वी’ संस्थेचे सर्व विद्यार्थी, अध्यापक कर्मचारी तसेच अन्य सामान्य नागरिकही सहभागी होणार आहेत, अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी दिली.