‘एकच वादा, महेश दादा’ च्या घोषणांनी भोसरी दुमदुमली
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०१९) :- भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ काल गुरुवारी भोसरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘रोड शो’चे आयोजन करण्यात आले होते. त्यास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘एकच वादा, महेश दादा’ अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
भोसरी पीएमटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हार घालून या ‘रोड शो’ला सुरुवात करण्यात आली. मतदारांना हात उंचावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांची मने जिंकून घेतली. या रोड शोमध्ये शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव, महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी महापौर नितीन काळजे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, प्रदेश भाजपच्या उमा खापरे, शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे आदी सहभागी झाले होते.
या ‘रोड शो’ला मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. कार्यकर्त्यांनी ‘वंदे मातरम्, भारत माता की जय, भाजप शिवसेना युतीचा विजय असो, एकच वादा, महेश दादा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी मतदारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुमचा आशीर्वाद पंतप्रधान मोदींना आहे का? तुमचा आशीर्वाद भाजप सेनेच्या विचारांना पक्का आहे का? तुमचा आशीर्वाद महेशदादा लांडगेंना आहे का? असे प्रश्न करत त्याची होकारात्मक उत्तरे वदवून घेतली. आपण मतदारांनी भोसरी मतदारसंघातून शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप, रयत क्रांती, शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार केल्याचे स्पष्ट दिसत आहे.
भोसरीच्या ‘रोड शो’ ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रभावित झाले त्यांनी चिंचवड येथील सभेत या ‘रोड शो’चा उल्लेख केला. मी भोसरीत ‘रोड शो’ केला, अख्खी भोसरी लोटल्यासारखे वाटत होते असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.















