न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०१९) :- दाम दुप्पट तसेच ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून १० हजार गुंतवणूकदारांची १०० कोटींहून अधिक रकमेची संस्कार ग्रुपकडून फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल तीन वर्ष फरार असलेल्या वैकुंठ कुंभार, त्याची पत्नी राणी कुंभार आणि मेहूणा रामदास बबन शिवले या तिघांना मध्य प्रदेशातील इंदौरमधून अटक करण्यात आली. तर यापूर्वी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
गुन्हा दाखल झाल्यावर आरोपीने आपल्या कुटूंबीय आणि नातेवाईकांसह शहरातून पळ काढला होता. तीन वर्षानंतरही आरोपी हाती लागत नसल्याने गुंतवणूकदारांनी माजी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची भेट घेऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. तेव्हापासून आर्थिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीच्या मागावर होते. तर अजय लेले, शिवाजी ढमढेरे व कमल शेळके यांना यापूर्वीच अटक झालेली आहे.
वैकुंठ कुंभार याच्या इंदौरमधील घरापर्यंत पोलीस पोचले. मात्र, याची कुणकूण लागल्याने तो पत्नीस सोबत घेऊन मुलांना शाळेतून आणण्यासाठी गेला. मात्र, तो शाळेच्या आवारातून बाहेर पडताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.











