- मावळ मतदारसंघातील सत्ता परिवर्तनाला सुरुवात?
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑक्टोबर २०१९) :- गेली अनेक वर्षे मावळचा कारभार पाहिलेल्या सत्ताधारी भाजपचा गड डळमळीत होत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी (दि. १४) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लोणावळ्याला आयोजित जाहीर सभेकडे मतदारांनी पाठ फिरवली. अत्यंत तुरळक गर्दीमुळे ही सभा सपशेल आपटली. मावळ मतदारसंघातील सत्ता परिवर्तनाला सुरुवात झाल्याची चर्चा होत आहे. दरम्यान, काल (रविवारी) चिंचवडच्या जाहीर सभेत भाजप आ. लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत रिंगरोड, अवैध बांधकामे, शस्तिकराच्या मुद्द्यांवरून संतप्त नागरिकांनी गोंधळ घातल्याने सभेला गालबोट लागले. त्यामुळे येत्या दिवाळीत भारतीय जनता पक्षाचे दिवाळे निघणार का? अशी कुजबुज सुरू झाली आहे.
देशात सर्वत्र भाजपचेच वर्चस्व असून मतदारांनाही तोच पक्ष सत्तेवर हवा आहे, असे चित्र निर्माण करण्यात आले. मागील पाच वर्षांपासून मतदारांची दिशाभूल केली जात आहे. देशातील आंध्रप्रदेश, तेलंगाणा, ओडिशा, प. बंगाल यासारखी राज्ये विविध क्षेत्रात प्रगती करीत असताना महाराष्ट्र मात्र मागे पडला आहे. अर्थव्यवस्था कोलमडली आहे, उद्योगधंदे बंद पडत आहेत, बेरोजगारी वाढली आहे, चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, शिक्षणाचा स्तर ढासळला आहे, गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली आहे, महिलांची असुरक्षितता वाढली आहे, जातीयवाद वाढल्यामुळे समाजात दुही निर्माण झाली आहे. लोकांना निर्भीडपणे विचार मांडता येत नाहीत. या आणि अशा विविध समस्यांना नागरिक गेली वर्षे तोंड देत आहेत. मूळ समस्येकडे दुर्लक्ष करून जनतेला मोठमोठ्या थापा मारून वेड्यात काढले जात आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाबद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे.
या नाराजीचाच उद्रेक पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात होणाऱ्या भाजपच्या प्रचार सभांदरम्यान दिसून आले आहे. रविवारी चिंचवड येथे आ. लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना रिंगरोड, अवैध बांधकामे, शस्तिकराच्या मुद्द्यावरून नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. ही घटना घडल्यावर दुसऱ्याच दिवशी लोणावळ्याला आयोजित योगी आदित्यनाथांच्या सभेकडे जनतेने पाठ फिरवली. या दोन मुख्य घटनांवरून जनतेचा कौल दिसला आहे, असे म्हटल्यास हरकत नसावी.











