न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑक्टोबर २०१९) :- भाजप हा बोलघेवड्यांचा पक्ष आहे. परदेशातून काळा पैसा आणू, शेतक-यांची कर्ज माफ करू अशी केवळ घोषणाबाजी भाजपने केली. मात्र, प्रत्यक्षात जीएसटी व नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. लोकांना हे सारे दिसते आहे म्हणूनच भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विरोधक उरले नाही असे म्हणता मग पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा का घेता? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी येथे केला.
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आकुर्डीतील खंडोबा मंदिर सभागृह येथे आयोजित प्रचार सभेत अजित पवार बोलत होते.
पवार म्हणाले की, आत्ताची निवडणूक ही महाराष्ट्राची निवडणूक आहे. त्यामुळे ३७० चा मुद्दा सांगू नका महाराष्ट्रात काय केले ते सांगा. शेतकरी आत्महत्या करत आहेत, शेतक-यांना ५० हजार कोटी वाटले असे मुख्यमंत्री सांगतात. पण ते खरे असते तर शेतक-यांनी आत्महत्या केल्या असत्या का? मागील पाच वर्षात राज्यात एक तरी नवीन उद्योग आला का? असा सवाल अजित पवार यांनी केला. मंत्रीमंडळातील २२ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत तरीही मुख्यमंत्री त्यांना क्लिनचिट देतात. मग एकनाथ खडसे, दिलीप कांबळे, प्रकाश मेहता यांना तिकिट का दिले नाही? असा सवाल त्यांनी केला.
नोटबंदी व जीएसटीमुळे औद्योगिक मंदीचे सावट आहे मात्र सरकार काही करायला तयार नाही. टेल्को, महिंद्रा, पारले, ऑटोमोबाईल इंडस्ट्रिज, आयटी कंपन्यांची काय अवस्था आहे? विकासदर का घटला? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असे आवाहन अजित पवार यांनी दिले. भाजपने मित्रपक्षांनाही फसवले आहे त्यांना त्यांच्या चिन्हावर लढू दिले नाही. कडकनाथ कोंबडी सदाशिव खोत यांना सोडेना अशी अवस्था आहे लोकात नाराजी आहे. काल चिंचवड येथे पंकजा मुंडे भाजपच्या प्रचार सभेसाठी आल्या असता शास्ती कर, अनधिकृत बांधकामे नियमितीकरण व रिंगरोड रद्द करा या विषयावर लोकांनी निदर्शने केली. भाजपने सत्तेचा गैरवापर करून त्यांना अटक केले हे लोकशाहीत योग्य नव्हे. आमच्या काळातही आंदोलने झाली पण आम्ही सत्तेचा असा माज कधी दाखवला नाही असे अजित पवार म्हणाले.
कारखान्याला मदत देतो, बँकेला मदत करतो, चौकशी थांबवतो, मदत न केल्यास प्लॉटवर आरक्षण टाकतो असे सांगून भाजप विरोधकांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहे. हे सगळे प्रकार थांबविण्यासाठी राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस – कॉंग्रेस आघाडीला मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन पवार यांनी केले.











