न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५) :- पदयात्रा, रॅलीला मिळणारा भरघोस प्रतिसाद, प्रचारामध्ये युवकांचा स्वयंस्फूर्तीने वाढता सहभाग यामुळे चिंचवड विधानसभा मतदार संघातील सर्वपक्षीय उमेदवार राहुल कलाटे यांचा प्रचार चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता चिंचवडमध्ये परिवर्तनाचे वारे वाहत असल्याची चर्चा मतदार संघात रंगली आहे.
शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार म्हणून शड्डू ठोकले आहे. सुरुवातील अपक्ष म्हणून मैदारात उतरलेले कलाटे सर्वपक्षीय उमेदवार ठरले आहेत. मतदार संघातील उच्चशिक्षित उमेदवार म्हणून ते चर्चेच्या केंद्रस्थानी असताना त्यांच्या पदयात्रा, रॅलींना होणारी गर्दी, मतदार संघातील सोसायट्यांकडून मिळालेला पाठिंबा यामुळे कलाटे यांची मतदार संघातील ‘क्रेझ’ वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कलाटे यांना पुरस्कृत केले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, काँग्रेस आणि मनसेने देखील कलाटे यांना पाठिंबा दिला आहे. सर्वपक्षीय कलाटे यांच्या मागे एकवटल्याचे चित्र असतानाच सामाजिक संघटनांकडूनही त्यांना पाठिंब्याचा ओघ सुरू झाला आहे.
मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेडच्या वतीने संघाचे जिल्हाध्यक्ष विशाल तुळवे, जिल्हा सचिव विशाल जरे, जिल्हा संघटक लघु लांडगे, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर लोभे, शहर संघटक रसिदभाई सय्यद, विनोद घोडके, वैभव जाधव यांनी राहुल कलाटे यांना पत्राद्वारे बिनशर्त पाठिंबा दिला. शास्तीकर, रिंग रोड, अनधिकृत बांधकाम हे प्रश्न सोडवतो असे सांगून सत्ते आलेल्या विद्यमान आमदारांनी यातील एकही प्रश्न आजपर्यंत सोडविला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आलेले भाजप सरकारने मराठा बहुजन समाजाचे शोषण करीत आहेत. शहरातील वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी, रस्त्याची दुरवस्था, पाण्याचा प्रश्न, आर्थिक मंदी याला सर्वस्वी फडणवीस सरकार जबाबदार असून याविरोधात राहुल कलाटे यांना पाठिंबा देत असल्याचे मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेडने नमूद केले आहे.
नागरी हक्क सुरक्षा समितीच्या वतीने अध्यक्ष मानव कांबळे यांनीही कलाटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शहरातील विविध सामाजिक प्रश्नांवर नागरी हक्क सुरक्षा समिती गेली अनेक वर्षे संघर्ष करीत आहे. मात्र, चिंचवड विधानसभा मतदार संघातील अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. सत्ताधार्यांकडून त्यास दाद मिळत नाही, त्यामुळे राहुल कलाटे यांना पाठिंबा देत असल्याचे नागरी हक्क सुरक्षा समितीने म्हटले आहे. सत्ताधार्यांविरोधातील रोष म्हणून सामाजिक संघटनांसह युवा वर्गाचा राहुल कलाटे यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. कलाटे यांच्या प्रचाराने आघाडी असून चिंचवड विधानसभा मतदार संघातील वातावरण ढवळून निघाले आहे.
अजित पवारांची सभा ठरली प्लस पॉईंट
राष्ट्रवादी काँग्रेसने राहुल कलाटे यांना पुरस्कृत केले आहे. राहुल कलाटे यांच्या प्राचारासाठी अजित पवार यांनी सोमवारी सभा घेतली. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अजित पवारांच्या सभेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला आहे. ही सभा राहुल कलाटे यांच्यासाठी प्लस पॉईंट ठरल्याची चर्चा चिंचवड विधानसभा मतदार संघात आहे.
संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा
चिंचवड विधानसभा मतदार संघातील सर्वपक्षीय उमेदवार राहुल कलाटे यांना मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेडच्या वतीने आज (सोमवारी) पाठिंबा देण्यात आला. तसेच नागरी हक्क सुरक्षा समितीचे मानव कांबळे यांनीही कलाटे यांना पाठींबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीपाठोपाठ आता मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेड, नागरी हक्क सुरक्षा समितीचेही पाठबळ मिळाल्याने कलाटे यांचे पारडे जड झाले आहे.















