न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी-चिंचवड-भोसरी विधनासभा मतदारसंघाची उद्या गुरुवारी (दि. २४) रोजी बालेवाडी येथे मतमोजणी होणार आहे. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मतमोजणीपासून योग्य अंतरावर थांबता यावे, यासाठी पोलिसांकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
शिवसेना-भाजपा-आरपीआय व मित्र पक्षांसाठी क्रीडानगरीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते म्हाळुंगे गावाकडील बाजूला थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. म्हाळुंगे गावात येणा-या नागरिकांनी म्हाळुंगे चौकी येथून डावीकडे कीर्ती एलिगंट सोसायटी समोरून सुनील नगर, मामासाहेब मोहोळ माध्यमिक विद्यालय, उत्तम स्वीट चौक या मार्गाचा वापर करावा.
काँग्रेस, राष्ट्रवादी व पुरस्कृत पक्षांच्या कार्यकर्त्यांनी क्रीडा संकुलाच्या हेलिपॅडसमोर महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर थांबावे. त्या ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची देखील सोय करण्यात आली आहे. इतर पक्षांकरिता हॉलिडे इन हॉटेलच्या पाठीमागील बाजूला शीतळादेवी मंदिराकडे जाणा-या रोडवर थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.















