- गटनेते राहुल कलाटे यांनी आयुक्तांकडे केली मागणी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी आणि अतिक्रमण विरोधी पथकाने आज शनिवारी (दि. २) रोजी वाकड परिसरातील दत्त मंदिर रस्ता या ठिकाणी कारवाई केली. यात बाळकृष्ण कलाटे स.न. १८७/५/१, अजय कलाटे सं.न. २४१ या दोघांच्या पत्राशेडवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. परंतु, शेजारील अनधिकृत शेडला नोटीस बजावून देखील त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. या दुजाभावाबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेचे गटनेते राहुल कलाटे यांनी आक्षेप घेत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे महापालिकेने आतापर्यंत केलेल्या कारवाईचा कागदोपत्री खुलासा मागितला आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात कलाटे यांनी म्हटले आहे की, अनाधिकृत बांधकाम व पत्राशेड होणे हे शहराच्या दृष्टिकोनातून चांगले नाही. परंतु, कारवाई करताना सर्व अशा प्रकारच्या पत्राशेडवर कारवाई होणं अपेक्षित होतं. परंतु, आपण वरील दोनच ठिकाणी कारवाई केली. आपण आजपर्यंत किती पत्रा शेडला नोटीस दिली व कारवाई केली त्याची माहिती देण्यात यावी.
महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम कलम १९६६ नुसार नोटीस देऊन कारवाई केली जाते. ही कारवाई सर्व नोटीस दिलेल्या अतिक्रमणावर होणे अपेक्षित असताना फक्त वरील दोनच पत्राशेडवर कारवाई का करण्यात आली? त्या कारवाईच्या बाजूलाच आपण नोटीस दिलेले अनधिकृत शेड आहे. त्याकडे का दुर्लक्ष करण्यात आले? आज झालेली कारवाई कोणत्या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली करण्यात आली व पोलीस बंदोबस्ताची लेखी मागणी कधी करण्यात आली होती, त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात यावी. वरील प्रकरणात तातडीने खुलासा मिळावा, असे या निवेदनात कलाटे यांनी म्हटले आहे.















