न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील जेष्ठ पत्रकार निशा पाटील-पिसे यांनी गुरुवारी (दि. ३१) रोजी काही अज्ञात कारणामुळे आत्महत्या केली. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरी-चिंचवड श्रमिक पत्रकार संघातर्फे आज (शनिवारी) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, अण्णा बनसोडे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, पीसीएनटीडीएचे अध्यक्ष सदाशिव खाडे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक नामदेव ढाके, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लांडगे, उपाध्यक्ष अनिल कातळे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर, नंदकुमार सातुर्डेकर, योगेश रांगणेकर आदी पत्रकार बंधू-भगिनी उपस्थित होते.
महापौर राहुल जाधव म्हणाले की, पत्रकार निशा पाटील-पिसे यांचे अकाली निधन मनाला चटका लावून जाणारे आहे. पत्रकार निशा यांच्या स्मृती जतन केल्या जातील. त्यासाठी महापालिकेतर्फे उपक्रम हाती घेण्यात येतील.
आमदार महेश लांडगे म्हणाले, पत्रकारांनी एकमेकांशी बोला, संवाद साधा यातून तणाव कमी होईल. निशाचे अचानक जाणे मनाला चटका लावणारे आहे. फक्त बातमीदारी करणे असा तिचा पिंड नव्हता. बातमी मागची बातमी शोधण्याची तिच्याकडे वेगळी कला होती. यावेळी उपस्थित मान्यवर व पत्रकारांनीही शोकसभेत आपले मनोगत व्यक्त केले.















