न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ नोव्हेंबर २०१९) :- फेसबुकचे बनावट अकाउंट बनवून त्यावर मैत्रिणीचे विवस्त्र फोटो अपलोड केल्याची गंभीर घटना पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी २१ वर्षीय तरुणीने चाकण पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार सुनील बांबू या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध चाकण पोलिस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २१ वर्षीय तरुणी आणि आरोपी हे पहिल्यांदा मुंबईमध्ये भेटले होते. तेथेच त्यांच्यामध्ये मैत्री झाली. मात्र त्यानंतर काही महिन्यांनी हे तरुण पिंपरी-चिंचवडमध्ये या तरुणीला भेटण्यासाठी आले. त्यावेळेस आरोपी सुनीलने फेसबुकवर या तरुणीच्या नावाने बनावट अकाऊंट तयार केले. या अकाऊंटवर सुनीलने फिर्यादीचाच फोटो प्रोफाइल फोटो म्हणून वापरला होता. याच अकाऊंटवरुन सुनिलने काही विवस्त्र फोटो अपलोड केले. तसेच मी देहविक्री करते अशी पोस्टही त्याने या अकाऊंटवरुन केली होती.
या सर्व प्रकाराची माहिती मिळताच फिर्यादी तरुणीने चाकण पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार (आयटी अॅक्ट) आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलिस मुख्य आरोपी असणाऱ्या सुनीलचा शोध घेत आहेत. सुनील गुजरातला पळून गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.












