- हिंजवडीकडे जाणाऱ्या वाहनचालकांना सत्तर टक्के मार्ग ट्रॅफिक फ्री…
- नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची माहिती
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ नोव्हेंबर २०१९) :- शहरातील औंध-काळेवाडी मार्गावरील साई चौक येथील उड्डाणपुलाची एक बाजूचे (काळेवाडी ते औंध मार्ग) काम पुर्ण झाले असून, त्यावरून नागरी वाहतुक सुरू करण्यात आली आहे. तसेच उड्डाणपुलाच्या दुसऱ्या बाजूचे (औंध ते काळेवाडी) कामही प्रगतीपथावर असून येत्या २० जानेवारीपर्यंत हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यात येणार असल्याचे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.
नगरसेवक काटे यांनी मंगळवारी (दि. ०५) रोजी साई चौक येथील उड्डाणपूलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी पीसीएनडीटीए चे कार्यकारी अभियंता वसंत नाईक, शाखा अभियंता पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी काटे म्हणाले की, साई चौक हा मुख्य रहदारी तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक दळणवळण असलेला चौक आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक समस्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत होती. नागरिकांना सतत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. सततच्या पाठपुराव्यामुळे नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने साई चौक येथे उड्डाणपूल निर्मितीची आखणी करण्यात आली. त्या दृष्टीने काम पूर्णत्वास येत आहे. या उड्डाणपुलामुळे या परिसरातील IT कंपनी, हिंजवडी हब मध्ये काम करणारा मोठा वर्ग व रहिवाश्यांना सतत होणाऱ्या वाहतुक कोंडीच्या समस्येपासून सुटका मिळणार आहे. तसेच या उड्डाणपुलामुळे हिंजवडीला जाणाऱ्या नागरिकांना वाहतूकीसाठी सत्तर टक्के मार्ग मोकळा (ट्रॅफिक फ्री) मिळणार आहे. या दोन्ही उड्डाणपुलामुळे काळेवाडी, वाकड, डांगे चौक, रावेत, नाशिक फाटा आणि पुणे शहराकडे जाणाऱ्यांना वाहतूक कोंडीपासून कायमस्वरूपी सुटका मिळणार असल्याचे नगरसेवक काटे यांनी सांगितले.












