न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ नोव्हेंबर २०१९) :- रावेत पोलीस चौकीचे पोलीस रावेत परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी रावेत चौकात नॅनो होम्स रेसिडेन्सी जवळ असलेल्या चौकात तीन वर्षांचा चिमुकला रडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
मुलगा एकटाच रडत उभा असल्याने तो हरवला असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याच्याकडे जाऊन त्याची चौकशी केली. त्याने केवळ त्याचे नाव सांगितले. त्याचा पत्ता आणि पालकांविषयी त्याला काहीही सांगता येत नसल्याने त्याच्या पालकांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते.
पोलीस कर्मचारी नवीन चव्हाण, गुजर, नंदलाल राऊत, संजय आंधळे आणि रावेत पोलीस चौकीच्या पोलिसांनी परिसरात शोध घेत अवघ्या दीड ते दोन तासात मुलाच्या बहिणीचा शोध लावला. वंश याचे वडील वारल्याने त्याचा सांभाळ त्याची सख्खी बहीण पूजा पवार या करत आहेत. तो घरासमोर खेळता खेळता रस्त्यावर आला आणि काही अंतर चालत गेल्याने घराचा रस्ता विसरला असल्याचे बहिणीने सांगितले. रावेत पोलिसांनी वंशला त्याच्या बहिणीकडे सुखरूपपणे सुपूर्द केले. वंशच्या नातेवाईकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले.














