- अन्यथा शिवसेना स्टाईलने कुत्री कार्यालयात सोडून आंदोलन करणार
- शिवसेनेचे संतोष सौंदणकर यांचा महापालिका आयुक्तांना इशारा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरात मोकाट कुत्र्यांचा कळप अनेकदा फिरताना दिसतो. त्यातच चिंचवडमधील रस्टन कॉलनी, गुरुकृपा हो. सो. व एस. के. एफ. वसाहतीत तर मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा वावर दिवसेंदिवस वाढतच आहे. याबाबत चिंचवड विधानसभेचे शहर संघटक तथा महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती, पुणे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी तसेच महापालिका आयुक्त यांना मोकाट कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.
सौंदणकर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, प्रभाग क्र. १८ चिंचवडगाव येथील रस्टन कॉलनी, गुरुकृपा हौसिंग सोसायटी व एस. के. एफ वसाहतीत भटक्या मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे परिसरात राहणारे नागरिक, आबालवृद्ध, शालेय विद्यार्थी तसेच लहान मुलांना कधीही कुत्री चावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. एखादी मोठी घटना घडण्याची वाट पाहण्यापेक्षा त्याआधी त्वरित उपाय योजना केल्यास नागरिक आपणास धन्यवाद देतील.
मागील तीन वर्षापूर्वी या भागातील नागरिकांनी तक्रार केल्यामुळे ज्या कुत्र्यांचे ऑप्रेशन करुन पुन्हा परत या भागात सोडून दिले होते. त्याच कुत्र्यांनी पुन्हा पिल्ले जन्माला घातली आहेत. हा झाला संशोधनाचा विषय. परंतु, मी यात जाणार नाही. नागरिकांची सुरक्षा ही माझ्या दृष्टीने महत्वाची आहे. तरी, नागरिकांच्या सुरक्षेसाठी व कुत्री चावण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी रस्टन कॉलनी, गुरुकृपा हौसिंग सोसायटी व एस. के. एफ. वसाहतीतील मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त त्वरित कस्न त्यांची योग्य ती खात्रीशीर शस्त्रक्रिया करण्यात यावी. काही घटना घडल्यास शिवसेना स्टाईलने कुत्री आपल्या कार्यालयात सोडून आंदोलन केले जाईल, असे या पत्रात सौंदणकर यांनी म्हटले आहे.














