न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा अधिकाऱ्यांवर वचक नसल्याने ते व्यवस्थित व गतीमानतेने कामे करीत नाहीत. त्यामुळे बहुतांश प्रकल्पांना अधिक वेळ जात आहे. तसेच, विविध योजना रखडल्याने विरोधकांना आयती संधी मिळत आहे. विविध कामांबाबत सातत्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे.
विविध प्रकरणात थेट मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रारी केल्या गेल्या. त्यामुळे शहरात सत्ताधारी भाजपची प्रतिमा मलीन होत असल्याचा सत्ताधारी नगरसेवकांचा सूर आहे. आयुक्तांनी आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल करावा. कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी सूचना सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना वारंवार केल्या.
मात्र, त्यास आयुक्तांनी जुमानले नाही. त्यामुळे आयुक्तांबद्दल सत्ताधारी पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांचा रोष आहे. निष्क्रीय आयुक्तांची तातडीने बदली करावी, अशी मागणी सत्ताधारी भाजपकडून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.















