- संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील घरोघरींचा कचरा एकत्र करून तो मोशी कचरा डेपो पर्यंत वाहून नेणे हे काम निविदा मागवून खाजगी ठेकेदारामार्फत केले जाते. यासाठी महापालिका करोडो रुपये मोजते. कारण शहरातील निर्माण होणारा कचरा पूर्णपणे संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोशी कचरा डेपो येथे पाठविला जातो. परंतु मागील दोन तीन दिवसापूर्वी रावेत येथील पंपिग स्टेशनच्या परिसरामध्ये कचऱ्याच्या तीन चार गाड्या नदीपात्रात कचरा टाकलेल्या आढळल्या आहेत. प्रत्यक्ष पाहणी केली असता हा सर्व कचरा कुजलेला असून तो पाइप नाले यातून काढलेला असावा परंतु तो मोशी कचरा डेपोकडे न पाठवता तो नदीपात्रात टाकून दिलेला आहे. तसेच पूर्ण शहराला जेथून पाणी उचलले जाते त्या पंपिग स्टेशन शेजारीच कचरा टाकल्यामुळे सुमारे २५ लाख नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
सदरची बाब अतिशय गंभीर असून आपण एका बाजूला स्मार्ट सिटीच्या गप्पा मरावयाच्या तसेच स्वछ भारत अभियान राबवायचे आणि करोडो रुपये कचरा संकलनासाठी ठेकेदाराला मोजावायचे. परंतु, शहरातील कचरा नदीपात्रात टाकला जात असेल तर शहराची वाटचाल कोणत्या दिशेने चालली आहे हे कळत नाही. त्याचप्रमाणे नदी सुधार प्रकल्पासाठीही आपण दरवर्षी अंदाजपत्रकात करोडो रुपये तरतुद करून नदी सुधार प्रकल्पावर खर्च करतो परंतु, त्या खर्चाचा काहीही फायदा होत नाही व नागरिकांचा कररूपी पैसा वाया घालवत आहोत. तसेच शहराची जीवनदायी असणारी पवना नदीला प्रदूषित करीत आहोत. हा सर्व प्रकार अतिशय गंभीर आहे.
रावेत येथील नदीपात्रात कचरा टाकण्याचा शोध लावून त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच मनपाने नेमलेल्या ठेकेदाराने जर हा कचरा टाकला असेल तर त्यांचे कामाचे आदेश तातडीने रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत तोच कचरा मनपाच्या मुख्यलयातील प्रवेशद्वारावर आणून टाकण्यात येईल, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा शहराध्यक्ष विशाल शंकर वाकडकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.












