- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेच्या भगव्याला मानवंदना देण्यासाठी तमाम शिवसैनिकांनी शिवतीर्थावर उपस्थित रहावं
- भोसरी-खेड सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद यांचं शिवसैनिकांना आवाहन….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०१९) :- शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी महाविकास आघाडीने जाहीर केले. त्यानिमित्त खेड-भोसरी विधानसभेचे सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद यांनी शिवसेनेच्या वतीने भोसरी व खेड परिसरात शिवसैनिकांच्या उपस्थितीत पेढे वाटून, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांच्या ‘उद्धव ठाकरे आगे बढो’, ‘हम तुम्हारे साथ है, जय भवानी’, जय शिवाजी’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे मंगळवारी सायंकाळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी महाविकासआघाडीच्या नेतेपदी आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असावेत, असा ठराव मांडला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सर्व आमदारांनी हा ठराव एकमताने मंजूर केला. राज्यपालांनीही उद्धव ठाकरे यांना सरकार बनविण्याचे निमंत्रण दिले आहे. उद्धव ठाकरे गुरुवारी (दि. २८ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी ५. ४५ वाजता शिवतिर्थावर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
इरफान सय्यद म्हणाले की, देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर गारूड निर्माण करणाऱ्या ठाकरे घराण्यातील तिसऱ्या पिढीतील नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री होणार आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला शब्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेर पाळला असून, येत्या गुरुवारी (दि. २८ नोव्हेंबर) रोजी विधानभवनावर भगवा फडकावून राज्यातील तमाम शिवसैनिकांचे स्वप्न सत्यात साकार होणार आहे. उद्या २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजता शिवतिर्थावर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथ विधी सोहळ्यास तमाम शिवसैनिकांनी हजर राहून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेच्या भगव्याला मानवंदना देण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन इरफान सय्यद यांनी यावेळी केले.















