न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०१९) :- निवडणुकीत खर्च करण्यासाठी पैसे न दिल्यावरून तसेच सुनेकडे बीएमडब्ल्यू कारची मागणी करत भाजप नगरसेविकेने सुनेचा छळ केला असल्याची फिर्याद सुनेने सांगवी पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी भाजप नगरसेविकेसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगरसेविका सासू आरती सुरेश चोंधे, पती संकेत सुरेश चौधे, दीर विनय सुरेश चौधे (सर्व रा. पिपळे निलख), सासूचा भाऊ किशोर निम्हण (रा. सकाळनगर), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी २७ वर्षीय सुनेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ एप्रिल २०१६ ते २६ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत ही घटना घडली आहे. सुनेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपींनी फिर्यादीकडे बीएमडब्ल्यू कार मागितली. लग्न झाल्यानतर निवडणुकीकरिता खर्च करण्यासाठी पैसे दिले नाही. तसेच फिर्यादी त्यांच्या घरात राहण्याच्या लायकीची नाही, असे म्हणून वेळोवेळी अपमान केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.












