- महिला व बालकल्याण समितीचा स्थायीकडे प्रस्ताव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा आयोजित केली होती. निर्मला कुटे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. या सभेत पवनाथडी जत्रा घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महापालिकेतर्फे महिला व बाल कल्याण योजने अंतर्गत पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाते. यंदाचे हे तेरावे वर्ष आहे.
जानेवारीच्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात जत्रा भरविण्यात येणार आहे. पिंपरीतील एच. ए. ग्राऊंड आणि सांगवीतील पी. डब्ल्यू. डी या दोन मैदानाचे पर्याय सुचविण्यात आले आहेत. सभेत सन २०२० या आर्थिक वर्षात पवनाथडी जत्रा भरविण्याचा ठराव नगरसेविका सुजाता पालांडे आणि निकीता कदम यांनी मांडला होता.
जानेवारी २०२० च्या पहिल्या अथवा दुस-या आठवड्यामध्ये जत्रा भरविण्यात यावी, तसेच जत्रेच्या आयोजनासाठी केलेल्या तरतुदी कमी पडल्यास आवश्यकतेनुसार महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत इतर योजना कार्यक्रम व तरतुदीतून खर्च करण्यात यावी. यासाठी प्रत्यक्ष येणा-या खर्चास मान्यता देण्यासाठी स्थायी समितीकडे शिफारस केली आहे.















