न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०१९) :- चिंचवड परिसरातील डांगे चौक येथे महापालिकेतर्फे ग्रेड सेपरेटर उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी डांगे चौकापासून गणेशनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर खोदकाम करण्यात येत आहे. चिंचवडमार्गे हिंजवडीला जाणाऱ्या या नियोजित कामाची सुरवात ३ ऑगस्ट २०१९ रोजी झाली असून कामाची मुदत १८ महिने आहे. त्यासाठी अपेक्षित खर्च २४ कोटी ७० लाख असून, ग्रेडसेपरेटरची लांबी ४८० मीटर , रुंदी १५. ५ मीटर आहे. आरसीसी बॉक्सची लांबी ६१ मीटर, उंची ५.५ मीटर प्रत्येकी ७ मीटर रुंदीचे दोन कॅरीज वे व दुभाजक ०. ५० मीटर असणार आहेत.
या ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाल्यानंतर चौकात वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. डांगे चौक हा खुप वर्दळीचा चौक आहे. या चौकातून पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग, मुंबई – बंगळुरू महामार्ग आणि किवळे – सांगवी फाटा बीआरटीएस रस्त्याला जाता येते. त्याशिवाय, हिंजवडी आयटी येथेदेखील मोठ्या प्रमाणात वाहनांची ये – जा सुरू असते. वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यावर उपाय म्हणून येथे ग्रेडसेपरेटर उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम फेब्रुवारी – २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे.















