न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ डिसेंबर २०१९) :- मातीच्या ढिगाऱ्याखील अडकलेल्या कर्मचाऱ्यांना काढण्यासाठी खड्यात उतरलेल्या जवानाच्या अंगावर मातीचा ढिगारा पडल्याने त्याखाली दबून जवानाचा मृत्यू झाला. दापोडी भागात ही घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शहीद झालेल्या विशाल जाधव या जवानाला आज अग्निशामक विभाग व महापालिकेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
विशाल जाधव यांना अग्निशमन विभाग संततुकाराम नगर येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी महापौर उषा ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसेविका सुजाता पालांडे, माई काटे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान उपस्थित होते.
काल रात्री ७ च्या सुमारास दापोडी येथील आई गार्डन जवळ ड्रेनेज लाईनसाठी खोदण्यात आलेल्या खड्यात एक कामगार पडला. त्याच्या अंगवार माती पडल्याने तो ढिगाऱ्याखाली दाबला गेला. त्याला वाचविण्यासाठी इतर काही तरुण खड्डयात उतरले. यावेळी बघ्यांच्या गर्दीमुळे आणखी माती या खड्डयात पडली त्यात इतर तरुणही दाबले गेले. या तरुणांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी सुरु असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनच्या दरम्यान विशाल जाधव यांच्या अंगावर देखील मातीचा ढिगारा कोसळला. यात त्यांच्या मृत्यू झाला. तसेच मातीखाली गाडल्या गेलेल्या नागेश कल्याणी जमादार या कामगाराचा देखील दुर्दैवी अंत या घटनेत झाला.















