जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड शहर हे जगाच्या नकाशावर एक वेगळी ओळख निर्माण केलेले विकसनशील शहर आहे. महापालिकेच्या आयुक्तपदी श्रावण हर्डीकर यांनी एप्रिल २०१७ ला कार्यभार स्विकारल्यानंतर एक कुशल प्रशासक म्हणून जबाबदारी बजावून प्रशासनात शिस्त आणून लोकभिमुख निर्णय घेणे अपेक्षित होते. परंतु, आयुक्तांची आजपर्यंतची वाटचाल ही निष्क्रिय व बोटचेपी धोरणाची राहिल्यामुळे शहराचे व शहरवासियांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.
संशयास्पद व वादग्रस्त कचरा निविदाप्रक्रिया, केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत सर्वेक्षणामध्ये महापालिकेची घसरण, २४ × ७ पाणीपुरवठा योजनेचे तीन तेरा, धरणक्षेत्रात मुबलक पाणीसाठा असताना देखील वारंवार पाणी कपातीचे धोरण, अनेक संशयास्पद निविदाप्रकीया, विकास कामे व ठेकेदारांना मुदतवाढ, ३१ मार्च २०१७ च्या अगोदरच्या ठेकेदारांच्या बिलांबाबत योग्य वेळी निर्णय न घेणे, YCM वैद्यकीय सेवेचा बोजवारा, खातेनिहाय चौकशीतून निर्दोष मुक्तता, विविध विभागातील वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांना अभय, नागरी हिताच्या सारथी हेल्पलाईन कडे दुर्लक्ष, हॉकर्स झोन धोरण अंमलबजावणीत अपयश, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना दुजाभावाची वागणूक, राजशिष्टाचार न पाळणे यामुळे त्यांना सत्ताधारी पक्षाचे घरगडी, दलाल, प्रवक्ते असे संबोधले जाऊ लागले, तरीदेखील त्यांच्या कामामध्ये कुठलीही सुधारणा झाली नाही.
भविष्यकाळात पिंपरी चिंचवड शहरास एक गतिमान विकसित शहर म्हणून पुढे न्यायचे झाल्यास आयुक्ताची बदली होणे ही काळाची गरज आहे, त्यामुळे या निष्क्रिय आयुक्तांची त्वरीत बदली करावी, असे शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे – पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.















