न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ डिसेंबर २०१९) :- दापोडी येथे ड्रेनेज लाईनमध्ये मातीच्या ढिगा-यात अडकून दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बचावासाठी गेलेल्या एका अग्निशमन विभागाच्या जवानाचा समावेश होता. ही घटना रविवारी (दि. १) रोजी सायंकाळी साडेपाच ते सोमवारी पहाटे साडेतीन या कालावधीत दापोडी पाण्याच्या टाकीजवळ घडली.
याप्रकरणी ठेकेदारासह महापालिकेच्या संबंधित अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील कन्स्ट्रक्शन व इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे मालक एम बी पाटील, सब कॉन्ट्रॅक्टर अशोक माणिकराव पिल्ले, सब कॉन्ट्रॅक्टर सुनील रमेश शिंदे, सुपरवायझर धनंजय सुधारक सगट यांच्यासह पिंपरी – चिंचवड महापालिकेचे संबंधित अधिका – यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कल्याणी पिरप्पा जमादार (वय ५६ रा. ओमकार वस्ती, फुगेवाडी. मूळ रा. कर्नाटक) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नागेश कल्याणी जमादार (वय २२) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी – चिंचवड महापालिकेकडून मे. पाटील कन्स्ट्रक्शन व इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने ड्रेनेजच्या पाईपलाईनचे काम घेतले होते. रविवारी सुट्टी असल्याने काम बंद होते. मात्र, पाईपलाईनसाठी खोदकाम करत असताना आरोपींनी सुट्टीच्या दिवशी कोणतीही परवानगी न घेता कामगाराला काम करण्यासाठी ड्रेनेजच्या लाईनमध्ये उतरवले. तसेच आरोपींनी सुरक्षेच्या नियमांचे पालन न करता कोणतीही सुरक्षा साधने न पुरवता काम करून घेतले. दरम्यान, वरून पडलेल्या मातीच्या ढिगा-यात अडकून मजुराचा मृत्यू झाला. याबाबत ठेकेदारासह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे तपास करीत आहेत.















