न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ डिसेंबर २०१९) :- मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव ७ ते १७ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम, संगीत व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी विश्वस्त विश्राम देव, आनंद तांबे, विनोद पवार आदी उपस्थित होते.
महोत्सवाचे उद्घाटन महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते शनिवार (दि. ७) रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. शुक्रवारी (दि. १३) रोजी सायंकाळी साडेसहाला ‘सुवर्ण युगाच्या स्वप्नांसाठी’ या विषयावर अविनाश धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन होईल. त्यानंतर अथर्वशीर्ष पठण, मोरया गोसावी चरित्र पठण होईल. भाऊ तोरसेकर यांचे ‘ विद्यमान सरकार समोरील आव्हाने ‘ या विषयावर व्याख्यान होईल. मुग्धा वैशंपायन यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम होणार आहे.
रविवार (दि. १५) सायंकाळी निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे कीर्तन होणार आहे. राहुल देशपांडे यांचा नाट्य संगीत व अभंगवाणीचा कार्यक्रम होईल. सोमवार (दि. १६) रोजी सायंकाळी पाच वाजता भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांचे ‘ धर्मनिरपेक्षता ‘ या विषयावर व्याख्यान होईल. यावेळी ट्रस्टच्या वतीने ‘ श्री मोरया जीवन गौरव पुरस्कार’ शांतीनाथ महाराज यांना प्रदान करण्यात येणार आहे.












