- स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांची महापौरांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने काळेवाडी फाटा ते देहू फाटा, आळंदी बी. आर. टी. रस्ता रुंदीकरणासाठी चिखलीतील कुदळवाडी परिसरातील घरांवर बुलडोझर फिरवीत रस्त्यासाठी बाधित नागरिकांची जागा संपादित केली. त्यामुळे बाधित नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. कुदळवाडीतील या बाधित नागरिकांना घरकुल योजनेमध्ये समाविष्ट करीत त्यांना घरे उपलब्ध द्यावीत, अशी मागणी ‘ फ ‘ प्रभाग कार्यालयाचे स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महापौरांना दिलेल्या निवेदनात यादव यांनी म्हटले आहे की, ”काळेवाडी फाटा ते देहु आळंदी रस्ता रुंदीकरणात कुदळवाडीतील अनेक नागरिकांची घरे पाडण्यात आली. विकास होत आहे, या कारणांनी सर्व नागरिकांनी रस्त्यास विरोध न करता आपली घरे स्वता:हून काढून टाकली. त्यातील काही नागरिकांना घरकुल प्रकल्पामध्ये घरे उपलब्ध झाली. परंतु, ७५ % नागरिकांना अद्याप घरे मिळालेली नाहीत.
महापालिकेच्या घरकुल प्रकल्पामध्ये रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या नागरीकांच्या घरांसाठी आरक्षण आहे. या प्रकरणी आपण जातीने लक्ष घालून, लवकरात लवकर उर्वरित नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती द्यावी व रस्ता बाधितांना न्याय मिळवून द्यावा, असे या निवेदनात यादव यांनी म्हटले आहे.












